Monday, November 15, 2010

आपण तयार आहोत?

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे संसदेतील भाषण हा त्यांच्या भारत दौऱ्यातील परमोच्च बिंदू ठरावा. ओबामा उत्कृष्ट वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेतच. या दौऱ्यात त्याची वारंवार प्रचिती आली. हॉटेल ताजमध्ये 26/11 च्या हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहताना, हॉटेल ट्रायडन्टमध्ये भारतीय उद्योजकांशी संवाद साधताना आणि सेंट झेवियर्समध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ओबामा यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर उपस्थितांना जिंकून घेतले. संसदेत ते त्यावर कळस चढवतील अशी अपेक्षा होती आणि ती पूर्णही झाली. भारताच्या सर्वोच्च नेतृत्वासमोरील भाषण हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी एक ठरावे.
संसदेत बोलताना ओबामांनी वारंवार भारत-अमेरिका मैत्री पर्वाची चर्चा केली. 21 वे शतक दोन्ही देशांच्या सहकार्याचे असेल आणि एकमेकांच्या मदतीने दोघेही जगासमोरील आव्हानांचा सामना करतील असा आशावाद त्यांच्या भाषणातून डोकावत राहिला. उद्याच्या जगाच्या जडणघडणीत भारताची महत्त्वाची भूमिका आहे, असे सांगतानाच सध्या भारत त्याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याबद्दल अस्पष्टशी नारीजीही व्यक्त केली. कठीण परिस्थितीत भारताने लोकशाहीचे रक्षण केले आहे. इतर देशांमध्येही लोकशाहीचे रक्षण व्हावे, मानवाधिकाराची पायमल्ली होऊ नये यासाठी भारताने जातीने लक्ष घालावे अशी ओबामांची अपेक्षा आहे. भारत आता उगवती महासत्ता राहिलेला नसून, महासत्ता म्हणून भारताचा उदय याआधीच झाला आहे, असे त्यांनी या दौऱ्यात जवळपास प्रत्येक भाषणात सांगितले.
ओबामांच्या या भावना अगदी खऱ्या आहेत आणि त्यांचा हेतू प्रामाणिक आहे असे गृहीत धरले तरी काही प्रश्न उपस्थित होतात. सर्वात प्रथम ओबामा म्हणतात त्याप्रमाणे भारत खरेच महासत्ता झाला आहे का हे पडताळून पहावेच लागेल. भारताचा एक वर्ग श्रीमंत आणि विकसित गटात मोडतो, पण त्याहून खूप मोठा वर्ग रोजच्या जगण्यासाठी धडपडतो आहे. मुळात भारताची लोकसंख्या प्रंचड असल्यामुळे येथील श्रीमंत आणि मध्यम-उच्चमध्यम वर्ग यांची संख्याच अनेक देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. थोडक्यात अमेरिकेला अपेक्षित असलेली ही बाजारपेठ म्हणजे एक वेगळे राष्ट्र आहे असे म्हणता येईल. पण उरलेल्यांचे काय? जागतिक स्पर्धेत आपण पुढे असावे असे वाटण्यात गैर काहीच नाही, पण ज्या देशात मोबाईलपेक्षा शौचालयांची संख्या कमी आहे तेथील सर्वसामान्यांना जगाचे नेतृत्व करण्याची ही आकांक्षा कशी काय समजावणार? श्रीमंत आणि मध्यम-उच्चमध्यम वर्ग वगळता उर्वरित भारताकडे फक्त पैसे कमी आहेत असे नाही तर हा वर्ग वंचित आहे. आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी अशा आवश्यक सुविधा त्यांना पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यांना दारिद्र्यातून बाहेर काढल्याशिवाय भारताला जगाचे नेतृत्व करणे जमेल? हा प्रश्न म्हणजे भारताच्या नेतृत्वगुणांवर घेतलेली शंका नाही किंवा निराशावादही नाही.
प्रश्न तीन गोष्टींचा आहे. एक म्हणजे अंतर्गत परिस्थिती, दुसरी इच्छाशक्ती आणि तिसरी म्हणजे नेतृत्वाची उपलब्धता. अंतर्गत परिस्थिती सुधारल्याशिवाय भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याचे नैतिक धैर्य येणार नाही हे अगदी नक्की. त्यासाठी 'नाही रे' वर्गाचा विकास साधण्यापासून नक्षलवादावर उपाय शोधण्यापर्यंत अनेक आव्हाने भारतासमोर आहेत. विकास म्हणजे टोलेजंग इमारती आणि झगमगत्या मोटारी नव्हेत, तर सर्वांच्या किमान प्राथमिक गरजा सहज पूर्ण व्हाव्यात अशी परिस्थिती निर्माण करणे हाच विकास. दुसरी बाब म्हणजे भारताकडेच जगाचे नेतृत्व करण्याची इच्छाशक्ती आहे का? पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची तशी इच्छा असल्याचे जाणवते, पण एक देश म्हणून भारतीयांची तशी तयारी आहे का हे बघावे लागेल आणि नसेल तर तशी तयारी करुन घ्यावी लागेल. एकीकडे भारतीय नागरिक कामानिमित्त जगभरात संचार करताना दिसतात, तर दुसरीकडे एक देश म्हणून आपण आपल्याच कोषात असल्याचे दिसते. जगाचे नेतृत्व करण्याची इच्छा बाळगणाऱ्या देशाला अशी प्रतिमा परवडणारी नाही. तिसरे म्हणजे भारताकडे जागतिक नेतृत्व देतील असे किती नेते आहेत? पंतप्रधान सिंग यांना जगभरातून आदर मिळतो किंवा प्रणव मुखर्जी यांची देशात ट्रबलशुटर म्हणून ख्याती आहे. पण 2014 नंतर हे दोन्ही नेते राजकारणात सक्रिय असणार नाहीत. त्यानंतर काँग्रेस किंवा भाजपसारख्या विरोधी पक्षांकडे अशा प्रकारचे नेतृत्व आहे का याचा विचार करणे भाग आहे. ओबामांनी मोठी स्वप्ने तर दाखविली आहेत, पण स्वप्न आणि सत्यातील दरी ओळखल्याशिवाय ती बुजवताही येणार नाही आणि स्वप्ने सत्यातही उतरणार नाहीत.