Saturday, June 15, 2013

तुम्ही, आम्ही, धर्म आणि राजकारण

निमित्त घडलं ते लोकलमध्ये घडलेल्या एका प्रसंगाचं आणि त्यासंबंधी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टचं. ती पोस्ट आधी खाली देते -
 
"आज लोकलमधून घरी परत येत असताना, चेंबूरहून एक मुलगी चढली. ट्रेनमध्ये बुरखा घातलेल्या मुली-बायका ही सर्रास गोष्ट आहे. तिनंही बुरखा घातला होता. आधी तिनं आपली बॅग सीटवर टाकली, मग बुरखा काढला. तिनं छानपैकी स्कर्ट-स्लीव्हलेस टॉप आणि वर जाळीदार काळं जॅकेट घातलं होतं. तिचा मेकअपही स्मार्ट होता. दिसायलाही छान होती. बसल्यानंतर तिनं आरामात उरलेला मेकअप पूर्ण केला. तिच्या शेजारची बाईसुद्धा तिच्याकडं कुतुहलानं... बघत होती. अखेर तिनं न राहवून विचारल्यावर त्या मुलीनं सांगितलं. "आमच्याकडं बुरखा घालावा लागतो ना, पण मला हे कपडे आवडतात. मग मी त्यावरून बुरखा घालते. घरचे पण खुश मलाही काही प्रॉब्लेम नाही." हा मुद्दा खरं तर एरवी तत्वाचा होऊन बसतो, पण तिनं त्या भानगडीत न पडता, साधा सोपा मार्ग काढला होता.
माझ्या लहानपणी स्त्रियांच्या समानतेचा-स्वातंत्र्याचा मुद्दा खूप जोरात असायचा, त्यावरून आंदोलनं व्हायची. त्याचा फायदा आजच्या बायकांना होतोच आहे. पण दुसरीकडं धार्मिकतेच्या नावाखाली स्त्रियांवर कट्टर बंधन घालण्याचं प्रमाणही वाढलंय. या मुलीनं स्वतःसमोरची समस्या सोडवण्यासाठी सगळ्या जगाशी भांडत बसण्यापेक्षा साधासोपा, अजिबात नवीन नसलेला मार्ग निवडला होता, मला तिचं कौतुक तर वाटलंच. तिनं न बोलता तिच्यावर बंधनं घालणाऱ्यांचा पराभव केलाय. तिच्या शेजारी बसून गप्पा मारणाऱ्या बाईलाही तसंच वाटलं असावं बहुधा. त्यामुळेच उतरताना त्यांनी पर्समधून एक चॉकलेट काढून तिच्या हातावर ठेवलं. मला दोघीही एकदम भारी वाटल्या." - 10 जून 2013.
 
यावर काही लाईक्स आणि काही कॉमेंट्स आल्या. त्यामध्ये एका कॉमेंटनं मला एकदम हिंदुत्ववाद्यांच्या रांगेत नेऊन बसवलं होतं. मला अर्थातच राग आला आणि मी कॉमेंट टाकणाऱ्याशी वादही घातला. पण या प्रसंगानं मला पुन्हा एकदा जाणवलं की आपल्याला प्रत्येक गोष्ट धर्माच्या चष्म्यातून बघायची सवय झालीये. ती सवय मोडायचा कोणी प्रयत्न केला तरी लोक तसं करू देत नाही, मी दोष लोकांना देतेय आणि स्वतःकडं घेत नाहीये कारण मी खरंच धर्माच्या चष्म्यातून कोणाकडं बघत नाही.
वरील पोस्टमध्ये धर्म होता, पण तो दुय्यम होता, मुख्य विषय होता तो त्या मुलीचा, स्त्रियांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू न देण्याचा. पण तो बाजूला पडला. एरवी फेसबुकवरच्या गोष्टी किती सिरीयस घ्यायच्या आणि किती लाईटली घ्यायच्या याचे माझे ठोकताळे ठरलेले असतात. पण घडल्या प्रकाराने मला मनस्ताप झाला हे खरं. आधी मला कॉमेंट टाकणाऱ्याचा खूप राग आला, पण राग फार काळ टिकत नाही. त्यावर माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. ते अजूनही सुरु आहे. 
शाळेत शिकत असताना जाती-धर्माचा विचार माझ्या डोक्यात नव्हताच, घरचे तसे संस्कारच नव्हते, काही अपवाद वगळता माझ्या मैत्रिणींच्या डोक्यातही असल्या फालतू विचारांना स्थान नसायचं. मी शाळेत असतानाच इंदिरा गांधींची हत्या झाली होती आणि भयानक दंगली झाल्या होत्या. आमच्या श्रीरामपूरमध्येही दुकानं अनेक दिवस बंद होती. अनेक शीख लोकांच्या दुकानांची जाळपोळ-लुटालूट झाली होती. त्यातले अनेक जण तर आमच्या माहितीतले होते. त्या दंगली थांबल्या आणि सर्व काही मागे पडलं. हिंदू आणि शीख अशी दरी निर्माण झाल्याचं मला तरी आठवत नाही. आमच्या कॉलनीत अनेक शीख घरं होती, त्यांची कोणाशी काही भांडणं झाल्याचं मी ऐकलं नाही. हा सर्व प्रकार काय आहे ते कळण्याचं माझं वयही नव्हतं. पण दिल्लीमध्ये काही शीखांनी इंदिरा गांधींना मारलं तर बाकीच्या शीखांची दुकानं का जाळली हा प्रश्न पडल्याचं मला आठवतं. आमच्यावर जाती-धर्माचे संस्कार न करणाऱ्या आई-पप्पांनाही त्याचं मला पटेल असं देता आलं असेल असं मला वाटत नाही. नंतर दंगे बंद झाले, कर्फ्यु उठला, शाळा नियमित सुरू झाल्या. गावात बाजारपेठेत थोडे बदल झाले होते. ज्या दुकानांची तोडफोड झाली होती त्यातल्या काही दुकानांची नावं बदलली गेली होती. त्याचीही सवय होऊन गेली. या आठवणीही मागे पडल्या.
घरीदारी राजकारणाची चर्चा असायचीच, आठवी-नववीला गेल्यावर त्यामध्ये रस निर्माण झाला. तेव्हा राजीव गांधीचा पराभव होऊन व्ही पी सिंग पंतप्रधान झाले होते. आज जसा भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजतोय तशीच तेव्हाही बोफोर्सची चर्चा खूप जोरात होती. फारसं न शिकलेले लोकही काही घोटाळा झाला की काही नाही हो, सगळं बोफोर्स आहे, असं म्हणायचे. वर्तमानपत्रांमध्ये काँग्रेसविरोधी लाट खूप जोरात होती आणि राजीव गांधींनी खरंच खूप मोठा भ्रष्टाचार केलाय असं मनोमन पटायचं. पण नंतर बोफोर्सची चर्चा फार झपाट्यानं मागे पडली. अचानक वेगळ्याच बातम्या यायला लागल्या. रामजन्मभूमीची चर्चा सुरू झाली होती. मला फारसं काही समजलं नाही म्हणून विचारलं, तर कळलं की अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बांधावं म्हणून भांडणं सुरू झालीत. पण त्यात भांडण्यासारखं काय आहे? माझा प्रश्न. रामाचा जन्म झाला तिथं सध्या मशिद आहे. मला मिळालेलं उत्तर. मग दुसरीकडं मंदिर बांधायचं. माझ्या दृष्टीनं सापडलं की उत्तर, त्यात काय एवढं? पण त्यात बरंच काही होतं. किती भयानक राजकारण होतं ते कळायला काही महिने जावे लागले. आणि नंतर एक दिवस अचानक लालकृष्ण अडवाणी नावाचे भाजपचे नेता राममंदिरासाठी रथयात्रेला निघाले. आणि जबरदस्त दंगे उसळले. सुदैवानं श्रीरामपूरमध्ये उसळले नाहीत पण देशाच्या अनेक भागात उसळले. खूप माणसं मेली. दोन्ही धर्मांची. मी अस्वस्थ होत राहिले. पण काहीच करू शकत नव्हते. काही कळतही नव्हतं. एका मंदिरासाठी इतकी माणसं मरावीत? तेही रामाच्या? मला लहानपणापासून माहित असेलला राम असा नव्हता. मग त्याच्या नावावर हे काय सुरू होतं? पण ते सुरू राहिलं. बराच काळ सुरू राहिलं. मग एक दिवस मशिद पाडली. काही लोकांनी खूप जल्लोष केला. छात्या फुगवल्या. जणू काही मोठं युद्धच जिंकलं होतं. भाजप आणि समर्थकांच्या दृष्टीनं तसं घडलं होतंच. त्यांच्या लोकसभेतल्या जागा झपाट्यानं वाढल्या. 2 वरून एकदम 85 आणि नंतर 120-161 असा टप्पा त्यांनी गाठला. भाजपचा राजकीय फायदा झाला. पण समाज? समाज दुभंगला, पुरेपूर दुंभगला. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी होते लालकृष्ण अडवाणी. काहींच्या दृष्टीने हिरो, काहींच्या दृष्टीने व्हिलन. माझ्या दृष्टीने व्हिलनच होते तेव्हा. पण अडवाणी या घडामोडींचा चेहरा होते. ते या सर्वांचा एकटे कर्ता-करविता नव्हते. त्यामागे बरंच काही राजकारण शिजलं होतं, या गोष्टी मला नंतर कळल्या. भाजप पुढे जात राहिला. समाजही पुढे जात राहिला. पण दुंभलेल्या अवस्थेत. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात खूप मोठी दरी निर्माण झाली. त्या काळाचं वर्णन नंतर बऱ्याचदा ऐकलं, वाचलं. India will never be same again, असं त्या कालखंडाचं वर्णन केलं जातं. मी ते स्वतः अनुभवलं आहेच. मी फार जग पाहिलंय असा माझा दावा नाही. पण हे सगळं माझ्या घडत्या वयात घडलं. त्यामुळे मनावर कोरलं गेलंय.
बाबरी मशिद पडल्यानंतर काही महिन्यांतच मुंबईतले भयानक ब़ॉम्बस्फोट घडले. मला आठवतंय, ही बातमी ऐकताना माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती तेव्हा. मी कॉलेजला होते, मुंबईपासून खूप दूर राहत होते, पण खूप काही वाईट घडलंय आणि आता आपल्या देशाचं काय होणार हा प्रश्न तेव्हा पडला. त्याचं उत्तर अजूनही सापडत नाही. मुंबईतल्या बॉम्बस्फोटांनी तर संपूर्ण मुस्लिम समाज बदनाम झाला. पुढे दहशतवाद हा जणू आपल्या जीवनाचा अविभाज्य घटकच बनला आणि मुस्लिमांना अधिकाधिक बदनाम करण्याचं षडयंत्र यशस्वी होऊ लागलं. पुढे २००२मध्ये गोध्राकांड घडलं, पाठोपाठ गुजरातच्या भयानक दंगली. हिंदुत्वाचा नवीन चेहरा समोर आला. अडवाणी होतेच, पण हा चेहरा त्याहून कडवा होता. राजकीय नैतिकतेचा सुद्धा न उरलेल्या काँग्रेसकडं या चेहऱ्याला थांबवण्याचं बळच नव्हतं. ११ वर्षांपूर्वी नव्हतं. आताही दिसत नाही. आणि अचानक मध्येच कधीतरी काही हिंदू दहशतवादी सापडले. आता मुस्लिम समाजाला बदनामीतून, देशद्रोहाच्या आरोपांतून थोडीशी उसंत मिळू लागली. सगळे दहशतवादी मुस्लिम कसे काय असतात?’ असा कुत्सितपणे आणि आपल्या मते बिनतोड प्रश्न विचारणे हिंदुत्ववादी थोडेसे थंडावले. दरम्यानच्या काळात अडवाणी थोडे मवाळ झाले असावेत. रथयात्रा काढून, देशभरात दंगली घडवून, शेकडो माणसांचे बळी जाऊनही आपण पंतप्रधान होऊ शकलो नाही यामुळे कदाचित त्यांना उपरती झाली असावी. आता ते हिंदुत्ववादाचा चेहरा नाहीत. भाजपच्या दृष्टीनं जगण्याची समृद्ध अडगळ होऊन बसलेत. अडवाणी आता मोदींना विरोध करताहेत आणि मोदीत्वाला विरोध करणारे संयुक्त जनता दलाचे नेते आता अडवाणीसुद्धा चालतील या टेकीला आलेत. भारतीय राजकारणाच्या दृष्टीने काव्यगत न्याय म्हणावा लागेल हा प्रकार.
काळाचा महिमा असेल हा. त्यानं राजकारण बदललं, हिंदूंना मुस्लिमांविरोधात भडकावणाऱ्या अडवाणींना थकवलं, पण समाजाचं काय? हिंदू आणि मुस्लिमांच्या मनातली एकमेकांबद्दलची संशयाची भावना कधी संपणार? प्रत्येक गोष्टीत धर्म शोधण्याची तुमची-आमची वाईट खोड कधी जाणार? वीसएक वर्षांपूर्वी मला आणि माझ्यासारख्या असंख्य मुक्यांना पडलेले हे प्रश्न, त्यांची उत्तरं कधी मिळणार? आणि मला हिंदूविरोधी किंवा मुस्लिमविरोधी ठरवण्याची दुसऱ्या-तिसऱ्याची प्रवृत्ती कधी बदलणार?