Friday, May 6, 2011

ओसामा संपला; पण भारतापुढील संकट कायम

ओसामा बिन लादेनचा मृत्यू ही गेल्या कित्येक महिन्यांतील हॉट न्यूज ठरली आहे. गेले दशकभर अमेरिका ज्या एका व्यक्तीच्या मागे लागेली होती, ज्याला पकडण्याच्या नावाखाली इराकला उद्ध्वस्त करुन तेथील तेलाच्या विहीरी अमेरिकी कंपन्यांना खुल्या करुन घेतल्या गेल्या, सद्दाम हुसेनना फासावर चढवण्यात आले, अफगाणिस्तानची धुळधाण करण्यात आली आणि दहशतवादविरोधी लढाईच्या नावाखाली पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची खिरापत वाटण्यात आली, असा तो ओसामा संपविण्यात अखेर अमेरिकेला यश आले. ओसामा किती क्रूरकर्मा दहशतवादी होता हे वेगळे सांगायची गरज नाही. पण तो मेल्यामुळे भारतासमोरील दहशतवादाची समस्या संपेल किंवा कमी होईल असे मानणे म्हणजे भाबडा आशावाद ठरेल. ‘World is a safer and better place without Osama,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष आणि परराष्ट्रमंत्री सांगतात, तेव्हा त्यांच्या वाक्यातील World याचा अर्थ America असा घ्यायचा असतो हे एव्हाना आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.
भारताला प्रामुख्याने धोका आहे तो पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेकडून. भारताचा विनाश हेच ध्येय असलेली ही संघटना सोयीनुसार एकेका दहशतवादी गटाला किंवा संघटनेला भारताविरोधात उभे करीत असते. त्यात खलिस्तानवाद्यांपासून आत्ताच्या लष्कर-ए-तैय्यबा या संघटनेपर्यंत अनेकांचा समावेश आहे. ओसामानंतर अल कायदाचे काय होणार, ही संघटना आता विस्कळीत होईल की सूडाच्या भावनेने अधिक घातक कारवाया घडवून आणेल यावर चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर आता लष्कर-ए-तैय्यबा ही भारताच्या दृष्टीने सध्याची सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना ही अल कायदाची जागा घेईल अशी अटकळही बांधली जात आहे. लष्कर अल कायदाची जागा घेवो अथवा न घेवो, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी लष्कर-ए-तैय्यबाच आहे. नव्वदीच्या दशकात अफगाणिस्तानमध्ये स्थापन झालेल्या एलईटीच्या कारवाया चालतात त्या प्रामुख्याने काश्मीरमध्ये. अफगाणिस्तानच्या पुनःउभारणीसाठी तेथे कार्यरत असलेल्या भारतीय अभियंते आणि इतर कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे कामही ही संघटना करते. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर एलईटीचे नाव भारतात सर्वतोमुखी झाले, पण त्याआधीही देशात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये लष्करचा हात होता. भारतापासून काश्मीर तोडणे आणि दक्षिण आशियामध्ये इस्लामिक सत्ता स्थापन करणे ही या संघटनेची सध्याची मुख्य उद्दिष्टे आहेत. दक्षिण आशियाबाहेरही आपला प्रभाव वाढवण्याचे काम ही संघटना करत असल्याचे अमेरिका आणि भारताच्या गुप्तचर खात्यांची माहिती आहे. तसे झाल्यास तिचा धोका आणखी वाढणार आहे. लाहोरजवळच्या मुदिरके या ठिकाणी लष्करचे प्रशिक्षण केंद्र आहे आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक छावण्या आहेत.
भारत, अमेरिका, युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया यांच्यासह पाकिस्ताननेही लष्करवर निर्बंध घातले असले तरी आयएसआयचा लष्करला सक्रिय पाठिंबा असल्याचे सज्जड पुरावे भारताने जगासमोर मांडले आहेत. भारताने अनेकदा पुरावे देऊनही अमेरिकेने लष्करविरोधात म्हणावी तशी कारवाई का केली नाही असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण मुंबई हल्ल्यातील महत्त्वाचा सूत्रधार डेव्हिड हेडली याचा इतिहास पाहिल्यास या प्रश्नाचे उत्तरही सापडेल. हेडली हा एकीकडे लष्करसाठी काम करत असताना अमेरिकेसाठीही डबल एजंट म्हणून काम करत होता. त्यामुळेच आज अमेरिकेने त्याला जीवाचे अभय देऊन तुरुंगात ठेवले आहे. हेडली आज आपल्याला माहित झाला, पण त्याच्याप्रमाणे एकाचवेळी अमेरिका आणि लष्करसाठी काम करणारे इतरही डबल एजंट असतील. त्यांचा वापर अमेरिकाविरोधी कारवायांचा माग घेण्यासाठी होत असेल तर त्यांना पुरेसे संरक्षण देण्याचे कामही अमेरिका करणार यात संशय नाही आणि युद्धाच्या व्यूहरचनेचा विचार केला तर त्यात फारसे चूक नाही. कारण इथे प्रत्येक देश स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो. अमेरिका असा स्वार्थी विचार करुन त्याची अंमलबजावणी करु शकतो आणि भारत कदाचित करु शकत नाही. हा फरक आहे आणि तो राहणार.
ओसामाला पाकिस्तानने दडवून ठेवले यामुळे आज अमेरिकेत पाकिस्तानविरोधाची लाट उसळली असली तरी त्यामुळे अमेरिका पाकिस्तानविरोधात एकदम कठोर कारवाई करेल, त्याच्या आर्थिक नाड्या आवळेल असे काहीही होणार नाही. कारण ओसामा संपला तरी अल कायदा शिल्लक आहे, अफगाणिस्तानात तालिबान काहीसा दुबळा झाला असला तरी सक्रिय आहे. महत्त्वाचे म्हणजे खुद्द अमेरिकेने मान्य केल्याप्रमाणे पाकिस्तानची भौगोलिक स्थिती अतिशय मोक्याची आहे. चीन आणि इराण या पाकिस्तानच्या शेजाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि वेळप्रसंगी त्यांच्याविरोधात कारवाया करण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे. त्यामुळेच भारताने पाकिस्तानविरोधात कितीही पुरावे दिले तरी अमेरिका एका मर्यादेपलिकडे भारताला मदत करु शकणार नाही, करणार नाही. ते त्यांच्या हिताचे नाही.
अशा परिस्थितीत भारतापुढील आव्हान वाढले नाही तरी कायम राहणार आहे. कारण लष्करला पाकिस्तान सैन्य आणि आयएसआयचा पाठिंबा कायम राहणार आहे. कोंडलेले मांजर अधिक धोकादायक होते, तशीच परिस्थिती पाकिस्तानची होण्याची शक्यता आहे. ओसामा प्रकरणामुळे पाकिस्तानी सैन्याची जगात अब्रू गेली आहे. त्यामुळे आधीच त्यांनी भारताला ‘आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका, आमच्यावर हल्ले करण्याचा विचारही मनात आणू नका’ अशा धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच लष्करच्या भारतविरोधी कारवाया वाढण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय काश्मीरमध्ये उन्हाळ्यामुळे बर्फ वितळलेले आहे, पंचायत निवडणुकीत लोक भरघोस मतदान करीत असल्यामुळे फुटीरवाद्यांचे नाक कापले गेले आहे. त्यामुळे लष्करने आता काश्मीरमध्ये घुसखोरी वाढवली तर त्यांना सीमेच्या दोन्ही बाजूंनी मदत मिळेल. लष्करच्या कारवायांना अटकाव करण्यासाठी आपली गुप्ततर संघटना अधिक बळकट करणे, सुरक्षा यंत्रणा सक्षम करणे, दहशतवादाचे राजकारण न करणे हे उपाय करावे लागणार आहेत. २६/११ नंतर भारतात पुण्यामध्ये जर्मन बेकरीची घटना वगळली तर दहशतवादी कारवाया झाल्या नाहीत. याचे श्रेय निश्चितपणे गुप्तचर संघटनांना द्यावे लागेल. आता तर त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहेत.
लष्करसारख्या दहशतवादी संघटनांचा आपल्या देशाच्या सुरक्षेला धोका असतोच पण सामाजिक सुरक्षाही धोक्यात येते. द.आशियात इस्लामिक सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लष्करने, हिंदू आणि ज्यू हे आपले शत्रू असल्यामुळे इस्राएल आणि भारत हे आपले मुख्य शत्रू देश असल्याचे जाहीर केले आहे. अशा गोष्टींना प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपल्याकडे स्वयंघोषित हिंदू देशप्रेमी ताबडतोब मुस्लिमद्वेषाची भूमिका जाहीर करतात आणि हे देशाच्या भल्यासाठी कसे आहे हे तारस्वरात सांगतात. यामुळे अर्थातच सामाजिक स्वास्थ्य बिघडते. मुळात कोणी एका संघटनेने स्वतःला अमुक एका समाजाचे नेते घोषित केल्यामुळे तो समाज आपोआप त्या संघटनेचा अनुयायी होत नाही ही बाब अनेकजण विसरतात किंवा त्यांच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे लष्कर सारख्या संघटनांनी स्वतःला मुस्लिमांचे मसिहा आणि नेते म्हणवून घेतल्याने प्रत्यक्षात तसे ते होत नाहीत ही बाब लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. जाती-धर्माचे राजकारण ही काही पक्षांसाठी अस्तित्वाचा प्रश्न असला तरी सर्वसामान्य भारतीयांच्या सुदैवाने तशी परिस्थिती नाही. अर्थात हे भान आपणच बाळगायचे आहे. (हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने आल्यामुळे विस्ताराने लिहिला. हा खरेतर स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) सध्या तरी ओसामाच्या मृत्यूनंतर सुटकेचा निश्वास सोडताना लष्करचा धोका सतत लक्षात ठेवावा एवढेच.

1 comment:

  1. good observations neema, you have became a seasoned journalist.great

    ReplyDelete