विधानसभा निवडणुकीची धुळवड सुरु आहे. नेहमीप्रमाणे आश्वासने, आरोप-प्रत्यारोप, प्रलोभने, बंडखोरी हे सर्व प्रकार आहेतच. पण त्याचबरोबर उद्धव विरुद्ध राज हा ठाकरे बंधूंमधला, चुलत बंधूंमधला म्हणूयात हवे तर, महातमाशा सगळ्यांना बघायला मिळतोय. दोन्ही भाऊ बाळासाहेब ठाकरेंच्या संस्कारांमध्ये वाढलेले, त्यामुळे एकमेकांचा शब्द खाली पडू द्यायला तयार नाहीत, एक जणानं आरोप केला की दुसऱ्यानं त्याला उत्तर दिलंच म्हणून समजा. इथपर्यंत ठीक आहे. निवडणुकीच्या रुक्ष फडामध्ये काहीतरी गंमत हवीच. अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपच्या कुठल्याही नेत्याला ग्लॅमर नावाचा काही प्रकारच नाहीय. त्यामुळे राज-उद्धव हा कलगीतुरा छान रंगत आणतोय. या सगळ्याला कोणाची काही विशेष हरकत असायचं कारण नाही.
माझा आक्षेप आहे तो मराठीच्या मुद्यावर. दोघेही मराठीचा मुद्दा अशा पद्धतीनं वापरताहेत, की जणू यांची आयुष्यं गेलीत मराठी माणसाचं भलं करण्यात. आपणच मराठीचे तारणहार, दुसऱ्याला दिलेलं मराठी मत वाया जाणार असा आविर्भाव दोघांनीही आणि त्यांच्या पाठिराख्यांनी आणलाय. मुळात मराठी माणसाच्या भल्यासाठी यांनी काय केलं ते सांगतील ते प्रामाणिकपणे. शिवसेनेच्या स्थापनेच्यावेळी त्यांनी मराठीच्या नावावर जे मुद्दे उपस्थित केले, तेच जर मनसे उपस्थित करणार असेल तर याचा सपशेल अर्थ असा होतो, की गेल्या त्रेचाळीस वर्षात शिवसेनेनं मराठी माणसाच्या उन्नतीसाठी खऱ्या अर्थानं काहीही केलेलं नाही. जर केलं असतं तर आज मनसेला ते मुद्दे मिळालेच नसते.
मुळात मराठी माणूस काय या दोन्ही पक्षांना बांधला गेलाय का? तो तसा बांधला जावा यासाठी त्यांच्याकडून विधायक प्रयत्न झालेत का? शिवसेनेच्या काळात दक्षिण भारतीयांना आणि मनसेच्या काळात उत्तर भारतीयांना विरोध एवढाच काय तो दोहोंमधला फरक.
राजकारण सोडा, साधा शिक्षणाचा मुद्दा घेऊयात. गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठी शाळा झपाट्यानं बंद पडताहेत. त्यासाठी काही कारणंही सांगितली जातात. मराठी शाळांमध्ये शिकून मुलं जगाची बरोबरी करु शकत नाहीत. ती जगाच्या पाठीमागं पडतात, असा सर्वसाधारण समज आहे. आणि तो काही प्रमाणात खराही आहे. मग मराठी शाळांमधला अभ्यासक्रम सुधारला जावा, मुलं उत्तम मराठी शिकावीत आणि त्याचबरोबर त्यांना चांगलं इंग्रजीही यावं यासाठी शिवसेना आणि मनसेनं काय केलं? काहीच नाही. मनसे जेमतेम तीन वर्षांचा पक्ष, त्यांना राजकारणात स्थिर व्हायला आणखी वेळ हवा अशी सवलत देऊयात, पण शिवसेनेचं काय, त्यांनी काय प्रयत्न केले? आणि केले असतील तर सांगत का नाहीत, की आम्ही मराठी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी या या गोष्टी केल्या. (विद्यापीठ पातळीवर राजकारण सोडून, तिथं विद्यार्थ्यांचं भलं होतं म्हणजे काय ते सगळ्यांनाच माहित आहे.) शालेय पातळीवर मराठी बिघडत आहे, किंवा बाजूला पडत चालली आहे, महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठात मराठी शिकायला विद्यार्थी मिळत नाहीत, अर्थातच भाषेत पुढचं संशोधन कमी होऊ लागलंय. ही बाब मराठी भाषेसाठी चिंताजनक नाही? राज्यात फक्त मराठी भाषेला वाहिलेली किती उत्तम ग्रंथालयं आहेत, किमानपक्षी प्रत्येक जिल्ह्यात मराठीला वाहिलेलं एकतरी सुसज्ज ग्रंथालय आहे का, हे माहित आहे का या दोन्ही नेत्यांना? नसेल माहित. त्यांना माहित असायचं कारणही नाही. कारण त्यांना माहित आहे, की आपण असले प्रश्न त्यांना विचारणारच नाही.
खरं तर मराठी भाषेकडे होणारं दुर्लक्ष हा स्वतंत्रच विषय आहे, पण तो मुलभूत मुद्दा आहे, त्यावर मतं मागायची प्रथा नाही म्हणून राजकारण्यांना त्याचं घेणंदेणं नाही. मराठी मतांचं काय, मराठी विरुद्ध अमराठी हा वाद महानगरांमध्येच मोठा होऊ शकतो. राज्यात सर्वत्र अमराठी नागरिक आहेत, आणि प्रत्येक राज्यात मराठी नागरिक आहेत, अगदी उत्तर प्रदेश-बिहारमध्येसुद्धा. मानवजातीचा इतिहासच सातत्यानं संक्रमणाचा आहे, स्थलांतर हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे. यापूर्वी लोक आपापला प्रदेश सोडून इतरत्र स्थायिक झालेत आणि यापुढेही होत राहतील. त्यांना राज आणि उद्धव कसं काय अडवू शकतात? मराठी अस्मितेच्या नावानं यांचं राजकारण, कसली आलीय अस्मिता आणि अस्मिता म्हणजे इतरांचा द्वेष हे कोणी सांगितलं? मराठीवर खरोखर प्रेम असेल तर भाषेच्या संवर्धनासाठी, संशोधनासाठी मरमर प्रयत्न करा ना. कोणी अडवलंय. पण आपल्या मुलांना आवर्जून इंग्रजी माध्यमांमध्ये शिकवणाऱ्या या नेत्यांनी आम्हाला मराठी प्रेम का शिकवावं? आपल्याला मत दिलं तरच मराठी माणसाचं भलं होईल, असं दोघंही सांगताहेत. हा तर विनोदच झाला. कोणाला मतदान करायचं ते लोक ठरवतीलच. सध्या तरी या दोघांनाही कोणाच्याही भल्याचं घेणंदेणं आहे असं दिसत नाही. या निवडणुकीत बाळासाहेबांचा वारसदार कोण ते ठरणार असं काही जण म्हणताहेत. बाळासाहेबांनी त्यांचा वारसदार तर केव्हाच नेमलाय. बाळासाहेबांचा वारसा म्हणजे नक्की कोणता, विचारांचा की मतांचा-पक्षाचा? दोन्ही भावांना वारसा हवाय तो मतांचा, बाकी सगळ्या गप्पाच. पाहुयात लोक कोणाच्या झोळीत दान टाकताहेत ते. बाकी निकाल काहीही लागला तरी आम्हीच मराठी जनेतेच खरे प्रतिनिधी असा दावा कोणा एकाला करता येईल, सुजाण महाराष्ट्राचं खरं दुःख तेच आहे. कारण दोघेही मराठी माणसाचे खरे प्रतिनिधी नव्हेत.