Tuesday, August 25, 2009

मेरा भारत....

१५ ऑगस्टच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे यंदाही मला एक इमेल आला. (आला की आली?) त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे देशप्रेमानं भारलेला मजकूर होता. गेल्या दहा हजार वर्षांपूर्वीपासून भारत हा सर्वश्रेष्ठ देश कसा आहे, भारतात कोणकोणते महत्त्वाचे शोध लागले, अमेरिकेत किती भारतीय आहेत आणि त्यांचं अमेरिकेच्या प्रगतीत काय योगदान आहे, असा भरणा त्या इमेलमध्ये होता. इमेल पाठवणाऱ्याच्या, किंबुहना ते तयार करणाऱ्याच्या देशभक्तीबद्दल मला काही शंका नाही. पण मला आक्षेप आहे, तो याबद्दल की हा सगळा डोलारा एका भासावर, illusion वर उभा आहे. भारत दहा हजार वर्षापूर्वी किती भारी देश होता, याचे सूर आळवून सध्याच्या समस्या सुटणार आहेत का? किंवा स्पष्ट शब्दांत बोलायचं तर भारत आज महान, सर्वश्रेष्ठ देश होणार का? नाही होणार. त्यासाठी काही हजार वर्षांपूर्वीच्या पिढ्यांनी जसे प्रयत्न केले, तसेच आपल्यालाही करावे लागणार आहेत. कमालीचं दारिद्र्य, असुरक्षितता, शिक्षणाचा बोजवारा, पाण्याच्या समस्या, पर्यावरणाचा नाश, भ्रष्टाचार अशी अनेक संकटं आपल्यासमोर आहेत. त्यातली कित्येक आपणच तयार केलेली आहेत. मुर्खासारखं पाणी वाया घालवणं, कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी किंवा इतरांआधी आपलं काम व्हावं म्हणून पटकन काही नोटा सरकवणं, आळस, काम न करता मोठमोठ्या गप्पा ठोकणं असे अनेक दुर्गुण आपल्यात आहेत. ते दूर केल्याशिवाय भारत महान कसा होईल? भ्रष्टाचार हा तर मोठा शत्रू आपणच तयार करुन ठेवलाय. भ्रष्टाचारामुळेच देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात येते, सरकारच्या काही उत्तम योजनांचा त्यामुळेच बोजवारा उडतो, अशा एक ना अनेक गोष्टी आहेत. साधं शिक्षणाचं उदाहरण घ्या. एकीकडे शाळांमध्ये शिक्षकच नसण्याचं प्रमाण मोठं आहे, दुसरीकडे हजारो बीएड, डीएडधारक विद्यार्थी बेकार आहेत. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे त्या एकत्र आल्या तर समस्या सुटायला थोडीफार तरी मदत होईल, पण तेही होऊ नये? ग्रामीण भागातले शिक्षकाविना असलेले विद्यार्थी आणि असे बेकार शिक्षक यांना एकत्र आणण्याची एकही योजना असू नये का? काही ठिकाणी आदर्शवादी तत्वांवर यासाठी काम होतं, पण त्यानं समाजाची संपूर्ण गरज पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचं पाठबळ लाभलेली ठोस योजनाच हवी. अशा खूप गोष्टी आहेत, शिक्षणाचं उदाहरण वानगीदाखल दिलं. मला हे म्हणायचंय की प्रयत्न केल्याशिवाय या समस्या सुटणार नाहीत. जिथे एकतृतियांश लोक भुकेकंगाल आहेत, धड वीस टक्के विद्यार्थीही पदवीशिक्षण पूर्ण करत नाहीत, तो देश महान कसा असेल? महान आणि श्रेष्ठ देशांमध्ये लोकांच्या अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. शंभर टक्के लोकांच्या गरजा कदाचित पूर्ण होऊ शकणार नाहीत. तसं कुठेच होत नाही, पण ज्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत असे नागरिक अपवादात्मक असावे लागतील. एक सुरक्षित आणि समाधानी समाज तयार झाल्याशिवाय आपला देश महान होणार नाही. आपल्याकडे खूप चांगले गुण असतील, उत्तम बुद्धिमत्ता असेल, पण या गोष्टी सुरक्षित समाजासाठीच उपयोगी आहेत. उपाशीपोटी उत्तम तत्वज्ञान कोणाला शिकवणार? त्यामुळेच इमेल तयार करणाऱ्या आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या माझ्या मित्रांना मला सांगावसं वाटतं, की आपला देश महान नाही, तो महान होऊ शकतो पण त्याला खूप कष्टांची गरज आहे. एका जुन्या सहकाऱ्याच्या सौजन्यानं गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची कविता वाचायला मिळाली, Where The Mind is Without Fear, माणसानं भयमुक्त जीवन जगावे, मुक्तपणे सर्वांना ज्ञान मिळावे ही त्यामागची कल्पना. बुरसटलेल्या विचारांमुळे माणसाची वैचारिक प्रगती थांबू नये, ही गुरुजींची आस. महान आणि सर्वश्रेष्ठ देशाची हीच खूण असेल.

Wednesday, August 19, 2009

निमित्त जिनांचे

अखेर जसवंत सिंग यांची भाजपमधून हकालपट्टी झाली. जसवंत सिंग यांनी नुकतंच बॅ. जिना यांच्यावर 'जिना - इंडिया, पार्टिशन, इन्डिपेन्डन्स हे पुस्तक लिहिलंय. त्यात जसवंत सिंग यांनी जिनांवर स्तुतीसुमनं उधळल्याचं सांगण्यात आलं. देशाच्या फाळणीला जिना नव्हे तर नेहरू आणि पटेल हेच जबाबदार होते, असं सिंग यांनी म्हटल्याचं सांगितलं जातंय. थोडक्यात काय तर इतके दिवस जे पाकिस्तान सांगत होता तेच जसवंत सिंग यांनी या पुस्तकात सांगितलंय. त्यामुळेच जसवंत सिंग यांच्यावर सर्व थरातून टीका होणं अपेक्षित होतं. त्याच कारणामुळे त्यांना पक्षातूनही काढून टाकण्यात आलं. वास्तविक पाहता लोकसभा निकालानंतरचा घटनाक्रम पाहिला तर जसवंत सिंग यांची पक्षातून गच्छंती अटळ होती. या पुस्तकानं भाजप नेतृत्वाला एक चांगलं निमित्त मिळवून दिलं. पण या घटनेमुळे काही प्रश्न उपस्थित झालेत.
एक म्हणजे जसवंत सिंग यांना अचानक जिनांचा पुळका येण्याचे कारणच काय? पुस्तक लिहिलंय म्हणजे त्यांनी जिना आणि इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास केलाय असं गृहित धरुयात. जिनांविषयी त्यांनी केलेली काही विधानं म्हणजे, ते सेक्युलर होते, त्यांच्याबद्दल भारतात मोठे गैरसमज आहेत, जिना फाळणीला जबाबदार नाहीत इ.इ., यातलं एक विधान म्हणजे जिना सेक्युलर होते, हे अंशतः सत्य आहे. जिना स्वतः धार्मिक नव्हते, ते धर्माचे नियम वगैरे फारसे पाळत नसत. किंबहुना त्यांच्या राहणीमानावर, आचार-विचारांवर ब्रिटीशांचा बराच प्रभाव होता. त्यांचं राहणीमान उच्च किंबहुना एकवेळेस तर त्यांच्याकडे काँग्रेसचा भावी अध्यक्ष म्हणूनही पाहिलं जात होतं. हे सगळं खरं असलं तरी याच जिनांनी स्वतंत्र पाकिस्तानसाठी हट्ट धरला हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. इतकंच नाही तर आपली मागणी पूर्ण होत नाही, याचा संशय आल्यानंतर त्यांनी १९४६ मध्ये डायरेक्ट अॅक्शनची घोषणा केली. त्यामध्ये लाखो नागरिकांचे प्राण गेले. त्यामध्ये हिंदूही होते आणि मु्स्लिमही. फाळणीचे देशावर काय परिणाम झाले, हिंदु-मुस्लिम संबंधांवर त्याचा काय परिणाम झाला हे कोणालाही वेगळे सांगायची गरज नाही, इतिहासाची ही काळी पानं चाळली तरी जिना हे देशासाठी नायक होते की खलनायक हे लक्षात येतं. वैयक्तिक आयुष्यात धर्म न पाळणाऱ्या जिनांनी राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करुन घेण्यासाठी धर्माचा आधार घेतला, यावरुन त्यांची नीतीमत्ताही लक्षात येते. अशा या जिनांबद्दल आधी लालकृष्ण अडवाणी आणि आता जसवंत सिंग यांना का आकर्षण वाटावे तेच कळत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकाचं निमित्त करुन भाजप नेतृत्वाने जसवंत सिंग यांच्यापासून स्वतःची सुटका करुन घेतलीय. याचा अर्थ भाजप नेतृत्व खूप वाईट आणि जसवंत सिंग हे धुतल्या तांदळासारखे असा मुळीच नाही. पण या प्रकरणामुळे देशातला विरोधी पक्ष असलेला भाजप आणखी धक्क्यात गेलाय. देशाची लोकशाही व्यवस्था चांगल्या पद्धतीनं चालायची असेल तर ताकदवान विरोधी पक्ष आवश्यक आहे. ताकदवान म्हणजे संख्येनं नव्हे, भाजपकडे चांगला विरोधी पक्ष होण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ आहे. पण ताकद हवी ती पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये, नेतृत्वामध्ये आणि कृतीमध्ये. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवनानंतर भाजप पुन्हा गळून गेल्यासारखा झालाय. त्यातच पक्षातल्या फाटाफुटीमुळे नेतृत्व बेजार झालंय, त्याचा परिणाम म्हणजे सरकारला मोकळं रान मिळालंय. देशात महागाईसारखे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत आणि त्यातले बरेचसे मानवनिर्मित म्हणजेच सुलतानी आहेत. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सरकारला कामाला लावण्याची भाजपची जबाबदारी आहे. पण पक्षनेतृत्वाला त्यात काही रस आहे का नाही हे कळतच नाही.
जिनांसारख्या बिनकामाच्या मुद्यांवरुन भाजप अडचणीत येत असेल, पक्षातली सुंदोपसुंदी वरिष्ठांना रोखता येत नसेल तर ही बाब नक्कीच गंभीर आहे. राष्ट्रीय संपत्ती असलेल्या नैसर्गिक वायूसाठी दोन भाऊ आपापसात भांडताहेत, त्यासाठी नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम मंत्रालय वेठीला धरलं जातंय आणि देशातला प्रमुख विरोधी पक्ष मुकाटपणे पाहतोय हे चांगलं लक्षण नाही. भाजपसाठी नाही आणि देशासाठीही नाही.