निवडणूक झाली, निकाल लागले, सरकार स्थापनेचा घोळ सुरु असला तरी एखाद-दोन दिवसात सरकार स्थापन होईल, जनतेच्या नावानं आणाभाका घेतल्या जातील आणि पुन्हा स्वतःपुरतं बघण्यात सरकार मग्न होऊन जाईल. विरोधी पक्षही विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा आपापसात सोडवून घेतील, थोड्याच दिवसात सारं काही आलबेल होऊन जाईल. पण यातून सामान्य जनतेला काय मिळालं असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. निवडणुका म्हणजे पैशांचा खेळ हे तर नेहमीचंच, सगळ्यांना पाठही झालंय. त्यात आता काही वावगंही वाटेनासं झालंय. पण यावेळी खरंच याचा वीट यावा इतका कळस झालाय. आणि सर्वात दुःखाची बाब म्हणजे प्रसारमाध्यमं त्यात अहमहमिकेनं सहभागी झाले. निवडणुका पैशांचा खेळ आहे ना, मग आम्हालाही त्याचा शेअर पाहिजे अशीच काहीशी मानसिकता प्रसारमाध्यमांची झाली. हे पाहून मन इतकं उद्विग्न होऊन जातं. लोकांनीही पैसे घेऊन मतं दिलीत. काही अपवाद असतील, पण अपवादापुरतेच. ही परिस्थिती बघितल्यानंतर राहून राहून एकच प्रश्न पडतो, आता पुढची पाच वर्षे सरकारला, लोकप्रतिनिधींना काहीही जाब विचारण्याचा अधिकार कोणाला तरी राहिलाय का? जनतेला, प्रसारमाध्यमांना, आणि जर यांनाच तो अधिकार राहिला नाही, तर सरकारवर अंकुश ठेवायचा कोणी? विरोधी पक्ष हे काम करेल ही अपेक्षाच सोडून दिलेली बरी.
एकीकडे Human Development Index मध्ये भारत पार कुठच्या कुठे अतिगरीब आफ्रिकी देशांमध्ये सँडविच होऊन बसलाय. श्रीलंका आणि बांगलादेशही आपल्या पुढे आहेत. आणि दुसरीकडे लोकशाहीच्या नावानं एकेका मतदारसंघामध्ये अब्जावधी रुपयांचा चुराडा झाला, हा भ्रष्टाचार एकीकडे आणि मुलखाची गरिबी दुसरीकडे, कसा सामना करणार याचा, कसा मेळ साधायचा? भ्रष्टाचार=गरिबी हे तर कायमचंच समीकरण. जिथे जनेतेनं भ्रष्टाचार केला, जिथे प्रसारमाध्यमांनी नंगा नाच मांडला, तिथे या भ्रष्टाचाराचा जाब कोण विचारणार? आणि कोणी विचारला तरी त्याला उत्तर देण्यात कोणाला रस असणार? आम्हाला मतं दिली म्हणजे काही उपकार नाही केले, कडक नोटा मोजल्यात त्यासाठी, असं उत्तर लोकप्रतिनिधींनी दिलं तर त्याची फिर्याद कोणाकडे नेणार?
हे लिखाण म्हणजे फार निराशादायक आहे, असं वाटेलही कोणाला, पण ही परिस्थिती भीषण नाही का, तुम्हीच सांगा. ही परिस्थिती बदलेल की नाही, त्यासाठी आपणच पुढे यायला हवं. आपण आपल्या समाधानासाठी एकमेकांमध्ये चर्चा करतो. ऑर्कुट, फेसबुकमध्ये त्यासाठी cause तयार करतो. पण त्याला मर्यादा आहेत कारण ते निष्क्रीय आहे. आता सक्रीय काही घडण्यासाठी आपणच पुढे यायला हवे, आपण म्हणजे खरंतर कोणीही, कारण सध्या तरी या आपणला काही चेहरा नाही. पण तो मिळावा. भ्रष्टाचारमुक्त, किंवा to be realistic कमी भ्रष्टाचारी समाज घडवण्यासाठी आपण काही करु शकतो का, आपल्याकडे काही कल्पना आहेत का, त्यासाठी काही चळवळ उभारता येईल का, काही दबावगट स्थापन करता येतील का, जनजागृती मोहिमा हाती घेता येतील का, असे अनेक उपाय कोणालाही सुचू शकतात. प्लीज, आता ते शेअर करुयात आणि हे थांबवू यात. कारण त्याविषयी चीड, संताप निर्माण झाल्याशिवाय हे पाप धुतलं जाणार नाही. आशेला काही तरी जागा निर्माण करुयात. आपणच हे करु शकतो. प्लीज....