अखेर जसवंत सिंग यांची भाजपमधून हकालपट्टी झाली. जसवंत सिंग यांनी नुकतंच बॅ. जिना यांच्यावर 'जिना - इंडिया, पार्टिशन, इन्डिपेन्डन्स हे पुस्तक लिहिलंय. त्यात जसवंत सिंग यांनी जिनांवर स्तुतीसुमनं उधळल्याचं सांगण्यात आलं. देशाच्या फाळणीला जिना नव्हे तर नेहरू आणि पटेल हेच जबाबदार होते, असं सिंग यांनी म्हटल्याचं सांगितलं जातंय. थोडक्यात काय तर इतके दिवस जे पाकिस्तान सांगत होता तेच जसवंत सिंग यांनी या पुस्तकात सांगितलंय. त्यामुळेच जसवंत सिंग यांच्यावर सर्व थरातून टीका होणं अपेक्षित होतं. त्याच कारणामुळे त्यांना पक्षातूनही काढून टाकण्यात आलं. वास्तविक पाहता लोकसभा निकालानंतरचा घटनाक्रम पाहिला तर जसवंत सिंग यांची पक्षातून गच्छंती अटळ होती. या पुस्तकानं भाजप नेतृत्वाला एक चांगलं निमित्त मिळवून दिलं. पण या घटनेमुळे काही प्रश्न उपस्थित झालेत.
एक म्हणजे जसवंत सिंग यांना अचानक जिनांचा पुळका येण्याचे कारणच काय? पुस्तक लिहिलंय म्हणजे त्यांनी जिना आणि इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास केलाय असं गृहित धरुयात. जिनांविषयी त्यांनी केलेली काही विधानं म्हणजे, ते सेक्युलर होते, त्यांच्याबद्दल भारतात मोठे गैरसमज आहेत, जिना फाळणीला जबाबदार नाहीत इ.इ., यातलं एक विधान म्हणजे जिना सेक्युलर होते, हे अंशतः सत्य आहे. जिना स्वतः धार्मिक नव्हते, ते धर्माचे नियम वगैरे फारसे पाळत नसत. किंबहुना त्यांच्या राहणीमानावर, आचार-विचारांवर ब्रिटीशांचा बराच प्रभाव होता. त्यांचं राहणीमान उच्च किंबहुना एकवेळेस तर त्यांच्याकडे काँग्रेसचा भावी अध्यक्ष म्हणूनही पाहिलं जात होतं. हे सगळं खरं असलं तरी याच जिनांनी स्वतंत्र पाकिस्तानसाठी हट्ट धरला हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. इतकंच नाही तर आपली मागणी पूर्ण होत नाही, याचा संशय आल्यानंतर त्यांनी १९४६ मध्ये डायरेक्ट अॅक्शनची घोषणा केली. त्यामध्ये लाखो नागरिकांचे प्राण गेले. त्यामध्ये हिंदूही होते आणि मु्स्लिमही. फाळणीचे देशावर काय परिणाम झाले, हिंदु-मुस्लिम संबंधांवर त्याचा काय परिणाम झाला हे कोणालाही वेगळे सांगायची गरज नाही, इतिहासाची ही काळी पानं चाळली तरी जिना हे देशासाठी नायक होते की खलनायक हे लक्षात येतं. वैयक्तिक आयुष्यात धर्म न पाळणाऱ्या जिनांनी राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करुन घेण्यासाठी धर्माचा आधार घेतला, यावरुन त्यांची नीतीमत्ताही लक्षात येते. अशा या जिनांबद्दल आधी लालकृष्ण अडवाणी आणि आता जसवंत सिंग यांना का आकर्षण वाटावे तेच कळत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकाचं निमित्त करुन भाजप नेतृत्वाने जसवंत सिंग यांच्यापासून स्वतःची सुटका करुन घेतलीय. याचा अर्थ भाजप नेतृत्व खूप वाईट आणि जसवंत सिंग हे धुतल्या तांदळासारखे असा मुळीच नाही. पण या प्रकरणामुळे देशातला विरोधी पक्ष असलेला भाजप आणखी धक्क्यात गेलाय. देशाची लोकशाही व्यवस्था चांगल्या पद्धतीनं चालायची असेल तर ताकदवान विरोधी पक्ष आवश्यक आहे. ताकदवान म्हणजे संख्येनं नव्हे, भाजपकडे चांगला विरोधी पक्ष होण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ आहे. पण ताकद हवी ती पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये, नेतृत्वामध्ये आणि कृतीमध्ये. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवनानंतर भाजप पुन्हा गळून गेल्यासारखा झालाय. त्यातच पक्षातल्या फाटाफुटीमुळे नेतृत्व बेजार झालंय, त्याचा परिणाम म्हणजे सरकारला मोकळं रान मिळालंय. देशात महागाईसारखे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत आणि त्यातले बरेचसे मानवनिर्मित म्हणजेच सुलतानी आहेत. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सरकारला कामाला लावण्याची भाजपची जबाबदारी आहे. पण पक्षनेतृत्वाला त्यात काही रस आहे का नाही हे कळतच नाही.
जिनांसारख्या बिनकामाच्या मुद्यांवरुन भाजप अडचणीत येत असेल, पक्षातली सुंदोपसुंदी वरिष्ठांना रोखता येत नसेल तर ही बाब नक्कीच गंभीर आहे. राष्ट्रीय संपत्ती असलेल्या नैसर्गिक वायूसाठी दोन भाऊ आपापसात भांडताहेत, त्यासाठी नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम मंत्रालय वेठीला धरलं जातंय आणि देशातला प्रमुख विरोधी पक्ष मुकाटपणे पाहतोय हे चांगलं लक्षण नाही. भाजपसाठी नाही आणि देशासाठीही नाही.
चला, जिना चढून तुझंही ब्लॉगविश्वात आगमन झालं तर... वा, वा.... नवे नवे साम्यवादी विषय आता वाचता येतील... keep it up...
ReplyDeleteजिन्नांचा पेहराव ब्रिटिशांसारखा होता म्हणून ते सेक्युलर होते, असं समजायचं कारण काय? याच हिशोबानं नेहरूंपासून सगळे काँग्रेसी नेते सेक्युलर समजायचे काय? धर्माच्या मु्द्द्यावर देश तोडणारा नेता हा सेक्युलर कसा असू शकेल. त्यामुळे जसवंत सिंग आणि तूझं म्हणणं अजिबात पटत नाहिये. आपल्याकडे सेक्युलरिझमची व्याख्या नव्यानं करायची गरज आहे, असं या निमित्तानं वाटतंय...
ReplyDeleteभाजपला सगळ्यात जास्त मिरच्या झोंबल्यात त्या सरदार वल्लभभाई पटेल यांना नेहरूंच्या रांगेत बसवल्यामुळे. पंतप्रधान व्हायला नेहरूंपेक्षा पटेल हेच कसे योग्य होते, हे संघ-भाजपचे नेते आयुष्यभर सांगत आलेत. अशा वेळी भाजपच्याच एका ज्येष्ठ नेत्यानं पटेलांना दूषणं द्यावीत, तीही पाकिस्तानच्या निर्मात्याची भलामण करताना... म्हणजे काय?
निमाच्या ब्लॉग प्रवेशामुळं आता साम्यावादीच नव्हे तर जागतिक स्तरावरचे आपल्याला कदाचित माहिती नसलेले विषयही वाचायला मिळतील. बुर्किना फासोमधील दुष्काळ, अंकारातील वादळ, आईसलंडमधील थंडी किंवा चिलीमधील भडका... असं काहीही वाचायला मिळायची शक्यता आहे. कारण निमाचं इंग्रजी पेपर, नियतकालिकांचं वाचन असो आणि इंटरनेटवर हिंदू, द न्यूयॉर्क टाईम्स, कॅनबेरा हेरल्ड, वॉशिंग्टन मॉर्निंगर अशा जागतिक स्तरावरच्या पेपर्सचं वाचन असो. निमाला माझा सलाम आहे. गंमत नाही. खरंच तिचं वाचन खूप आहे. त्यामुळं हे विषयही आपल्याला वाचायला मिळतील.
ReplyDeleteआणखी एक म्हणजे संघ आणि भाजपवाल्यांना झोडणारे कॉलम्स वाचायची सवय करुन घ्यायला हवी. शिवसेना किंवा मनसेलाही ही सोडणार नाही. चला निमाचं स्वागत करुयात...
भारतीय इतिहासात फाळणीचा काळा अध्याय जिनांमुळे लिहिला गेला हे खरंय. मात्र फाळणी झाली नसती आणि स्वतंत्र हिंदुस्थानात एक छुपं पाकिस्तान जास्त धोकादायक झालं नसतं का? मग जिना खरोखरच खलनायक ठरतात का याचा विचार करायला हवा..
ReplyDeleteदोन भावांच्या भांडणाबद्दल विरोधी पक्षाला काही वाटत नाही हे देशासाठी चांगलं नाहीच. पण सत्ताधारी पक्षालाही याबद्दल काही वाटतं नाही हे देशाचं मोठं दुर्दैव...
सागर गोखले
निमा तु आमच्यासारखं ब्लॉगविश्वात पदार्पण केलं त्याबद्दल प्रथमतः तुझ अभिनंदन, जिनाचे अर्टिकल निश्चीत चांगले आणि वेगळे आहे. भविष्यातही असंच वेगळ विषय तुझ्याकडून वाचायला मिळतील ही अपेक्षा, ब्लॉगच्या नव्या इनिंगबद्दल मनापासून शुभेच्छा
ReplyDeleteब्लॉगचा प्रयत्न चांगला आहे. पहिल्या टप्प्यात एकदम जमला आहे असे मी म्हणणार नाही पण जो आशय पोहोचविणे गरजेचे आहे तो पोहोचतो हे मात्र नक्की....
ReplyDeleteमोहम्मद अली जीना यांच्याबद्दल येथील मुस्लीम लीग या पक्षालाही कधी पुळका आल्याचे माझ्या वाचनात नाही. परंतु अलीकडच्या काळात लालकृष्ण अडवाणी असोत किंवा जसवंतसिंह, यांना एवढे जिनाप्रेम का दाटून यावे याचा उलगडा होत नाही. निमाताई आपण तो केला असता तर बरे झाले असते. दुसरे असे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जसवंतरावांच्या जीन्नाप्रेमाबद्दल इतके ऐकत होता पण पुस्तक प्रकाशित होईपर्यंत त्यांनी आपल्या लाठ्या म्यान केल्या होत्या का ? म्हणजे एका अर्थी त्यांनाही हे पुस्तक प्रकाशित झालेले हवे होते असेच म्हणावे का ?
खराब झालेले किंवा फारसा उपयोग नसणारी पाने खुडली की त्या जागी नवी पालवी येते. जसवंतसिंह किंवा अडवाणी हे सध्या अशाच पानांपैकी एक आहेत.अडवाणींनी आपल्या राजकीय भवितव्यासाठी सुधिंद्र कुळकर्णींचा 'ब'चा 'ब' केला. पण जसवंतसिंहांना तशी सोय उपलब्ध झाली नाही.
राहता राहिला विरोधी पक्षाची गरज. खरोखरच हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. किमान त्यासाठी का होईना पण सबळ विरोधी पक्षाची गरज आहे. भाजपसारखा पक्ष किमान लोकसभेचे कामकाज चालविण्यासाठी सहकार्य तरी करतो असे माझे निरीक्षण आहे. संसदेच्या प्रेस गॅलरीत बसून मी त्यांच्या सदस्यांचे बारीक निरीक्षण केले आहे. पण सपा, बसपा किंवा इतर छोटे प्रादेशिक पक्ष लोकसभेचे कामकाज बंद पाडण्याची संधीच शोधत असतात. निमाताईचा हा मुद्दा पटतो.
ता. क. आपला तर शॉल्लेट संशोय है की जिन्नाचे पुस्तक लिहिण्याचा सल्ला त्यांना आपल्या अडवाणींनीच दिला असावा.....
जीना,इसी का नाम है ।
ReplyDelete