Monday, September 14, 2009

साधेपणाचे ढोंग

महात्मा गांधींची हत्या झाली, त्यानंतर अल्बर्ट आईनस्टाईन यांनी म्हटलं होतं, की या पृथ्वीवर अशा प्रकारचा माणूस होऊन गेला हे येणाऱ्या पिढ्यांना खरंच वाटणार नाही. आईनस्टाईन जितका थोर शास्त्रज्ञ होता, तितकाच थोर द्रष्टाही होता. त्याचं द्रष्टेपण आपल्याच राजकीय नेत्यांनी सिद्ध केलंय. महात्मा गांधी यांचा साधेपणा खरंच अस्तित्वात होता का असा प्रश्न बहुधा त्यांना पडलाय. अन्यथा उठता बसता गांधीजींचं नाव घेणाऱ्या आपल्या नेत्यांनी, यांना नेते कशाला म्हणायचं, राजकारण्यांनी-हाच शब्द ठीक आहे, गांधीजींची साधेपणाची व्याख्या केव्हाच गुंडाळून ठेवलीय. आजकाल, खाजगी विमानानं किंवा बिझिनेस क्लासनं प्रवास करण्याऐवजी इकॉनॉमी क्लासनं प्रवास करणं यालाच साधेपणा म्हणतात. या सगळ्याला निमित्तमात्र ठरले ते एस एम कृष्णा आणि शशी थरुर हे परराष्ट्र खात्याचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री... त्यांच्या उंची हॉटेलमधल्या खर्चिक राहणीमानाची चर्चा वर्तमानपत्रांमधून झाली. महाराष्ट्रासारख्या दुष्काळाच्या झळा बसलेल्या मोठ्या आणि काँग्रेसशासित राज्यात निवडणूक तोंडावर आली असताना मंत्र्यांची उधळपट्टी लोकांच्या नजरेत भरणं सोयीचं नव्हतंच. त्यामुळे वरिष्ठांच्या आज्ञेनुसार सर्व मंत्री बचत करत असल्याचं दाखवू लागले.

काय आश्चर्य आहे, बघा. इकॉनॉमी क्लासने प्रवास करुन मंत्रीगण बचत करु लागलेत. पण त्यांच्या एरवीच्या उधळपट्टीचं काय? म्हणजे कृष्णा आणि थरुर हे दोन्ही मंत्री हॉटेलमध्ये रहायला गेले त्याचं कारणच मुळात उधळेपणा हे आहे. त्यांना दिलेले बंगले त्यांना आवडले नाहीत, त्यामुळे त्यांच्या डागडुजीचं (?), काम सध्या सुरु आहे. त्यावर काही लाख किंवा कोटीसुद्धा रुपये खर्च होणारच आहेत, किंवा होत आहेत. त्या पैशांचं काय, आम्ही हॉटेलमध्ये आमच्या पैशानं राहतो, असं मानभावीपणे सांगणारे नेते, या बंगल्यांच्या सुशोभीकरणासाठी पैसा कुठून येतो हे सांगणार आहेत का? जनतेचा पैसा आपल्या उंची राहणीमानासाठीच आहे, अशीच जर सर्व राजकारण्यांची धारणा असेल तर काही बोलायलाच नको. याला काही मूठभर अपवाद असतील, पण मूठभरच.

खरं तर परिस्थिती अशी आहे, की यासंबंधीच्या येणाऱ्या बातम्यांकडे आपण मनोरंजन म्हणूनच बघतो. हे सर्व ढोंग आहे, हे आपल्यालाही माहित आहे. नाही का.

सरकारच्या दिखाऊ बचतीच्या धोरणाचा आणि मंदीचा नक्कीच काहीतरी संबंध आहे, नाही का? जागतिक मंदीला कारणीभूत ठरलेल्या अमेरिकेतल्या लेहमन ब्रदर्सने एक वर्षापूर्वीच दिवाळखोरीचा अर्ज भरला होता. त्यानंतर वर्षभरानं बचत सुरु झालीय याला काय म्हणावं?

1 comment:

  1. निमा माय
    साधेपणाची व्याख्या कोण कसे करतो यावर अवलंबून आहे. माझ्या मते साधा माणूस फक्त राहणीमानावर अवलंबून नसतो. काही जणांच्या साधेपणावर कोट्यवधी रूपये खर्च होतात. एक माजी राष्ट्रपती रोजच्या जेवणात फक्त दहि भात आणि क्वचित प्रसंगी रोटी, चपाती खात. पण त्यांच्या दहि भातासाठी राष्ट्रपती भवनामध्ये करावी लागलेली व्यवस्था काही कोटी रूपयांची होती हे फारच लोकांना माहिती असेल. ( अतिशय गुप्त माहिती )
    दुसरी गोष्ट गांधीजींच्या साधेपणाची.... गांधीजीही आज हयात असते तर म्हणाले असते " वाकई, जमाना बदल गया है " आणि त्यांना उत्तर देताना मग नेहरू म्हणाले असते. हाँ गांधीजी ....

    ReplyDelete