Monday, September 14, 2009

रात्र वैऱ्याची....दुसरे कारगिल?

गेल्या काही दिवसांमध्ये दोन तीन गोष्टी वाचायला मिळाल्या, एक तर चीन वारंवार आपल्या हद्दीत घुसखोरी करत आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये चीननं काही जमीन ताब्यातही घेतली असल्याचं तिथले राज्यकर्ते सांगताहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी एक महत्त्वाची कबुली दिली. अमेरिकेने मदतनिधी म्हणून दिलेला पैसा भारताविरुद्ध वापरला. तो सैन्य बळकटीसाठी वापरला असं मुशर्रफ म्हणत असले तरी त्याचा खरा अर्थ काय ते कोणीही सांगू शकेल. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिका आता इराकमधली काही शस्त्रसामुग्री तालिबानविरुद्धच्या लढाईसाठी म्हणून पाकिस्तानात वळवण्याचा विचार करत आहे. नाव तालिबानचं असलं तरी त्याचा उपयोग काय होईल ते सांगायला नको. मुशर्रफ यांच्या कारकीर्दीत मिळालेला निधीही तालिबानविरुद्धच्या कारवाईसाठी म्हणूनच मिळाला होता. याव्यतिरिक्त पाकिस्तानातून आलेली आणखी एक बातमी, तिथल्या बहावलपूर या शहरामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या कारवाया जोरात सुरु आहेत. बहावलपूर हे पंजाब प्रांतातलं खेडेवजा शहर. एरवी त्याचं नाव आपण ऐकतो तिथं कधीमधी क्रिकेटचे सामने व्हायचे म्हणून. पण हेच बहावलपूर जैशचं बलस्थान आहे. सध्या पाकिस्तान म्हटलं की सगळ्यांना तालिबान, स्वात खोरे, अफगाण सीमा याच गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे जैशकडे सगळ्यांचंच बऱ्यापैकी दुर्लक्ष झालंय. त्याचा फायदा जैश घेत आहे. बहावलपूरमध्ये काही भुयारंही खोदलेली असावीत, असा अंदाज आहे, तसं असेल तर त्याचं दुसरं टोक भारताच्या सीमेजवळच कुठेतरी निघालं असणार. या सगळ्या बाबींचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे, ते सहज लक्षात येईल. याव्यतिरिक्त आणखी एक बाब म्हणजे भारतात वाढलेलं बनावट नोटांचं प्रमाण. नेपाळचा माजी राजपुत्र पारस याचा दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचं यासंबंधी पकडलेल्या एका गुन्हेगारानं मध्य प्रदेशच्या पोलिसांना सांगितलंय. थोडक्यात, भारतात बनावट नोटा वितरीत करण्यासाठी नेपाळमधले उच्चपदस्थ कार्यरत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पाकिस्ताननं वाघा सीमेवरुन तोफाही डागल्या. म्हणजे आपल्या शेजाऱ्यांपैकी एक श्रीलंका सोडलं तर सगळेजण भारतविरोधी कारवायांमध्ये दंग आहेत. चीननं काही आगाऊपणा केलाच तर श्रीलंका आपल्याला मदत करण्याऐवजी तटस्थ राहण्याची शक्यता जास्त आहे, कारण लिट्टेविरोधी लढाईतून आपण अंग काढून घेतलं असताना, चीननं श्रीलंकेला बरीच मदत केली. बांगलादेश तर ईशान्य भारतातल्या अतिरेक्यांसाठी नंदनवन झालंय. भूतानचा प्रश्न नाही. पण एरवी आपल्या सीमा कधी नव्हे त्या इतक्या जास्त असुरक्षित झाल्यात. त्या आधीही होत्या, पण इतक्या निश्चित नव्हत्या. याचा अर्थ आणखी एक कारगिल होऊ शकतं का, असा प्रश्न मला पडलाय. खरंतर तशी भीती वाटतेय. आपल्या सरकारनं हे सगळं इतकं सहजपणे का घेतलंय अशी शंका आहेच. पण ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या सरकारच्या आल्या नसतील असं थोडंच आहे. फक्त सरकार काही करताना दिसत नाही. कदाचित करतही असेल, आपण सामान्य माणसं, आपल्यापर्यंत ही माहिती येईलच असं नाही. पण चीननं घुसखोरी केलीच नाही, असं जर सरकार म्हणत असेल आणि ती झाली असल्याचे पुरावे प्रसारमाध्यमांकडे असतील तर काय म्हणावे. सरकार जाणूनबुजून इतक्या मोठ्या धोक्याकडे दुर्लक्ष करेल? तसं वाटत नाही. असंही असू शकतं, की इतक्या मोठ्या प्रमाणात धोका वाढल्याचं सांगून सरकारला देशात घबराट पसरवायची नसेल, कारण तसं झालं तर पहिला परिणाम शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर होईल. ते या क्षणाला आपल्याला परवडणारे नाही. नक्षलवाद, देशाच्या बहुतांश भागात दुष्काळ आणखीही काही कारणं असू शकतील. ही सरकारला संधी देण्याची गोष्ट झाली. पण सरकार खरंच गाफील राहिलं तर? आपल्यासा नकाशात दिसतो, त्याचा एक-तृतियांश काश्मीरच आपल्या ताब्यात आहे. त्यातलाही काही भाग आता चीननं गिळंकृत केला तर ते दुःख सहन होणार आहे का आपल्याला? नाही होणार. दहा वर्षांपूर्वी, एक कारगिल पाकिस्ताननं घडवलं. आता चीन पाकिस्तानचीच मदत घेऊन तसंच दुःसाहस करु बघतोय. कारगिलमधून आपण पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांना बाहेर काढलं असेल, पण आत यायची त्यांची हिंमत झालीच कशी या अपमानाचं शल्य बराच काळ बोचत राहिलं होतं. त्याच्या दशकपूर्तीनिमित्त तोच संताप, तेच दुःख आम्हाला नको. म्हणूनच मला भीती वाटतेय. दुसरं कारगिल होईल का याची.. होऊ नये ही आपली इच्छा, ती पूर्ण होणं आपल्या राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे.

4 comments:

 1. आपल्याला ज्या गोष्टी समजतात त्या सरकारला समजत नसतील, असं मला वाटत नाही. मुळात असल्या गोष्टींकडे गांभिर्यानं बघण्याची आपल्या नेत्यांची मानसिकताच नाही... (ही परंपरा नेहरूंपासून सुरू आहे. नवी नाही... सियाचीनमध्ये गवताचं पातही उगवत नाही... मग ते चीननं घेतलं तर बिघडलं कुठे, असं पंडित नेहरूच म्हणाले होते ना?) देशाचा एखादा भाग दुस-या देशानं तोडून नेला तरी यांना काही फरक पडत नाही... त्यांना इंटरेस्ट असतो स्वतःच्या तुमड्या भरण्यात आणि स्वतःची उदोउदो करून घेण्यात... ए पासून झेडपर्यंत... सगळे एकजात निर्लज्ज आहेत. दुसरं काही नाही...

  ReplyDelete
 2. Vikrant said,
  nima bare zale tu national security cha vichar karu laglis. ya nimitane deshacha vichar karna rya madhye tuza samavesh zala. tu ani me evdech karu shkto.
  chala ya nimitane ek sangto, border paryant ale belapur paryant yayla vel lagnar nahi, zoptana I-Pod peksha latne/chaku tari ghevun zop.

  ReplyDelete
 3. I appreciate your nationalism but first and foremost duty of journalists is to verify the facts. stories of Chinese incursions are nothing but Media Hype, said National Security Advisor and Defense Ministry Spokesperson. There is no evidence whatsoever about Chinese incursions.

  ReplyDelete
 4. @ Sunil,
  I know the basic of journalism, not to hype, but this blog was written much earlier of NSA's clarification. Only if it could have come earlier!
  Thanks anyway.

  ReplyDelete