Thursday, February 4, 2010

थँक्स परेश मोकाशी!!

एखादी जाहिरात तंतोतंत खरी आहे, असं कितीदा घडतं? मी तरी अशी खरीखुरी जाहिरात आतापर्यंत पाहिली नव्हती. काल पाहिली. 'रक्तरंजित सूड, मादक नृत्य, थरारक स्टंट्स आणि भावनिक हलकल्लोळ नसलेला अफाट आणि अचाट चित्रपट!' या जाहिरातीतला प्रत्येक शब्द खरा आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाची ही जाहिरात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे निर्माते दादासाहेब फाळके यांच्यावर बेतलेला हा चित्रपट.
केल्फा या नावाने जादूचे प्रयोग करता करता, फाळके या गृहस्थाच्या नजरेला चित्रपटाची जाहिरात पडली आणि इतिहासाला प्रारंभ झाला. चित्रपट पाहण्याचं वेड लागल्यावर, हे पडद्यावरचं नाटक निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यासाठी किती कष्ट पडले, याची चित्तरकथा आपल्याला हरिश्चंद्राच्या फॅक्टरीत बघायला मिळते. पण या फॅक्टरीचं वैशिष्ट्य हे चित्रपटात कुठेही त्या कष्टांचं भांडवल करण्यात आलेलं नाही. हलती चित्र सादर करण्याच्या वेडापायी फाळकेंना घरातली एकेक वस्तू विकावी लागली. पण हे सगळं फाळके कुटुंबियांनी सहज सहन केलं. त्यामध्ये कुठेही अतिरिक्त त्यागाची भावना दिसत नाही. चाळीत राहणाऱ्या फाळकेंच्या घरात सर्वात प्रथम विकलं जातं ते लाकडी कपाट, पण त्याचं घरच्यांना काही दुःख वाटत नाही. दुःख वाटतं ते शेजाऱ्यांना. खरंतर या ठिकाणी सनईचे रडके सूर काढण्याची पुरेपूर सोय होती. पण दिग्दर्शकानं हे रडके सूर इथेच नाही तर संपूर्ण चित्रपटात कुठेही वापरले नाहीत. अगदी एकदा शुटिंग करताना फाळकेंचा मुलगा जखमी होतो, तिथेही नाही. पण मुलाला कवटाळणाऱ्या फाळकेंमधला बाप मात्र तिथे दिसतो.
सरळ मार्गाने उत्तुंग ध्येय गाठताना पराकोटीचे कष्ट, अनंत अडचणी यांचा सामना करावाच लागणार, त्याला पर्यायच नाही. पण या अडचणींवर लक्ष केंद्रीत करायचे की प्रत्यक्ष ध्येय गाठल्याच्या आनंदावर, यातला दुसरा पर्याय दिग्दर्शकानं निवडलाय. मला तरी ही बाब खूप महत्त्वाची वाटते. हा चित्रपट पाहताना फाळकेंना किती अडचणी आल्या याची जाणीव होते. पैसे जमवण्यापासून ते चित्रपटासाठी स्त्री पात्र मिळवण्यापर्यंत. चांगल्या घरातल्या स्त्रिया सोडाच, पण अगदी देहविक्रय करणाऱ्या स्त्रियासुद्धा चित्रपटात काम करणे वाईट दर्जाचे समजत होत्या. शेवटी एका पुरुषालाच तारामतीची भूमिका साकारावी लागली. या ना त्या, अनेक अडचणी. त्या प्रत्येक अडचणीवर मात करत फाळकेंनी त्यांचं ध्येय गाठलं. त्यांना आलेली प्रत्येक अडचण, त्यांच्या कष्टाला कमीपणा न आणता, अगदी हलक्याफुलक्या पद्धतीनं समोर येते.
फाळकेंनी पहिला चित्रपट हरिश्चंद्रावर काढला, ही बाब अगदी पहिल्या प्रसंगापासून आपल्यावर ठसत जाते. त्यामुळेही अगदी पहिल्यापासून आपण त्यात समरस होऊन जातो. या घटनेचा कालावधी टिळकांच्या बरोबरचा आहे. म्हणजे लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना फाळके चित्रपटाच्या जुळवाजुळवीत गुंतलेले असतात. कधीतरी त्यांच्यासमोरुन स्वराज्याचे नारे देणारे तरुण जातात, पोलिस त्यांना उचलून नेतात. फाळके त्यामध्ये सहभागी होत नाहीत. पण म्हणून ते देशप्रेमी नव्हते असे कोण म्हणेल? परदेशात चित्रपट निर्मितीसाठी सर्व मदत मिळत असताना, फाळकेंनी ती नाकारली. मला इथे नाही तर माझ्या देशात चित्रपटनिर्मिती करायची आहे. नाहीतर तिथे चित्रपटांचा उद्योग कसा बहरेल अशी विचारणा ते करतात. स्वातंत्र्यपूर्व काळातही देशाच्या उभारणीत फाळकेंचं केवढं मोठं योगदान होतं, याची दखल आतापर्यंत फारशी कोणी घेतलेली नाही.
आज वर्षाला जवळपास नऊशे चित्रपट निर्माण करणारी आपली भारतीय चित्रपटसृष्टी. हरिश्चंद्राची फॅक्टरी पाहताना, धुंडिराज गोविंद फाळके या वल्लीचे आपल्यावर केवढे मोठे ऋण आहेत याची प्रखर जाणीव आपल्याला होते. ती करुन दिल्याबद्दल दिग्दर्शक परेश मोकाशींना लाखलाख धन्यवाद!

9 comments:

  1. Hi, Nima
    great, I like ur script writing thoughts...
    keep it up, all the best ...

    ReplyDelete
  2. yes..paresh mokashi, Nandu Madhav did a very god job. `H F` is a very nice film

    ReplyDelete
  3. yes it is not only a movie....its a birth story of bolliwood industry....

    ReplyDelete
  4. हलत्या चित्रांचा विजय असो... :)

    ReplyDelete
  5. नीमा मस्त लिहीलं आहेस.. नीमा तुला एक सांगू का.. चित्रपट पहात असताना मला खुप अस्वस्थ वाटायला लागलं. जवळपास सगळ्याच गोष्टी आपल्याला सिकवल्या जातात, सहज उपलब्ध होतात, अशा काळात मी जन्माला आलोय. मग संधर्ष करायला न लागल्यामुळे मी किती गोष्टी करतो.. उत्तर आहे काहीच नाही.. ऑफीसमधलं काम हा चरीतार्थ झाला. त्याव्यतिरीक्त काय.. शून्य... दादासाहेबांसारख्यांनी शुन्यातून विश्व उभं केलं. या पिढीतला मी मात्र विश्वातून शून्य करतोय.

    ReplyDelete
  6. या विषयावर बरेच ब्लॉग दिसत आहेत. पण चित्रपट पाहिल्यावरच ब्लॉग पूर्ण वाचेन म्हणतो.--सागर

    ReplyDelete
  7. @ सागर,
    चालेल, एकवेळ ब्लॉग वाचायचा राहिला तरी चालेल, पण चित्रपट अवश्य बघा.

    ReplyDelete
  8. Chhan Lihile aahe. Chitrpataevedhach mala te aavadale.

    Sateesh.

    ReplyDelete
  9. chaan lihile ahe. chitrapataitkech sunder!!!!

    ReplyDelete