Wednesday, September 22, 2010

जबाबदारी आपलीच

अयोध्येचा निकाल दोनच दिवसांत अपेक्षित आहे आणि सरकारी पातळीवर असला तरी वातावरणात तणाव दिसत नाहीय. अगदी त्याच जागेवर मंदिर किवा मशिद बांधली पाहिजे असं वाटणाऱ्यांचा १८ वर्षांपूर्वीचा उन्मादही आता दिसत नाही ही समाधानाचीच बाब आहे. याचा अर्थ आपापसातील द्वेषभाव संपला आहे असे नाही, पण द्वेषाने आपलं काहीच हित साधत नाही, फायदा होतो तो फक्त मुठभर राजकारण्यांना आणि ज्यांचे हितसंबंध अशा भांडणात गुंतलेले असतात त्यांचाच हेही लोकांच्या लक्षात आले आहे. थोडक्यात सांगायचे तर अयोध्या निकालाशी बहुतांशी नागरिकांना काहीच घेणंदेणं नाही, अनेक ठिकाणी तर शांतता राखण्यासाठी दोन्ही समुदायांचे नागरिक स्वतःहून पुढाकार घेत आहेत. म्हणजेच ‘आमच्या मर्जीशिवाय तुम्ही आमचा फायदा करुन घेऊ शकणार नाही’, असा संदेश लोक देत आहेत.
अयोध्या प्रकरणी राजकीय, धार्मिक नेत्यांनी सर्वसामान्य जनतेचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करुन घेतला. हा जसा त्यांचा दोष आहे तसा सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलाही आहे. जर त्यांनी आपल्याला वापरून घेतलं तर आपणही त्याना स्वतःचा वापर करु दिलाच की. १८ वर्षांपूर्वी केलेली चूक नागरिक आता सुधारु शकतात तर अजून एक चूक आपण सुधारू शकतोच, ती म्हणजे भ्रष्टाचाराची. आपल्या सगळ्यांना भ्रष्टाचाराची इतकी सवय लागली आहे की हा एक भयंकर गुन्हा आहे हेच आपल्या ध्यानात राहिलेले नाही. आधी काही हजार, काही लाखांत होणारे घोटाळे आता हजारो कोटी रुपयांचे आकडे घेऊन समोर येतात आणि आपल्याला त्याचे काहीही वाटत नाही. गेल्या दोन वर्षांतच दोन मोठे आर्थिक घोटाळे उघड झाले आणि त्यावर एक समाज म्हणून आपण अतिशय थंड प्रतिक्रिया व्यक्त केली. एक म्हणजे टू जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि दुसरा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाच्या तयारीतील घोटाळा. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने 70 हजार कोटींची सीमा गाठलीय तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये नक्की किती घोटाळा झाला त्याचा अंदाज अजून येत नाहीय. आतापर्यत या स्पर्धेसाठी किमान दीड लाख कोटी रुपये खर्च आला आहे, स्पर्धेच्या तयारीची अवस्था पाहता त्यापैकी किती रक्कम भ्रष्टाचाराच्या खात्यात जमा झाली असेल ते सांगता येत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून आपण भ्रष्टाचार फक्त बघतच नाही तर सहन करत आलो आहोत आणि कळत नकळत त्याचा हिस्साही बनलो आहोत. त्याचा विपरित परिणाम आपल्याच आयुष्यावर झाला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, अपुऱ्या पायाभूत सुविधा, पर्यावरणाच्या समस्या, कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, या आणि इतर अनेक समस्यांच्या मुळाशी आहे तो भ्रष्टाचार. आपण ते इतकी वर्षे का सहन केले ते माहित नाही. पण आता तरी सहन करु नये. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील भ्रष्टाचाराचा परिणाम देशाच्या प्रतिमेवरच झालाय. उभ्या जगात देशाचं हसं झालंय. जगातील तिसरी महासत्ता म्हणून आपल्याकडे बघितलं जात असताना एक साधी क्रीडास्पर्धा आपल्याला भरवता येऊ नये? महासत्ता म्हणजे काय फक्त आर्थिक विकासाचा दर, शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि परकीय चलनाची गंगाजळी एवढाच अर्थ होतो का? एखादे भव्यदिव्य काम करता येऊ नये आपल्याला? नक्कीच करता आलं असतं. आपल्याला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे हक्क 2003 मध्येच मिळाले होते. सात वर्ष हा काही कमी कालावधी नाही. तरीही कलमाडी आणि कंपनी आपल्याला नक्की कोणत्या कामात किती पैसे खायचे आहेत याचे नियोजन करीत राहिली, स्पर्धेचे काय होईल, नियोजनात काही त्रुटी राहिल्या तर देशाचे नाव बदनाम होईल, महासत्ता म्हणवू पाहणाऱ्या आपल्या देशाला उभं जग हिणवेल या कशाचीही चिंता त्यांना नव्हती. कारण ते निर्ढावलेले भ्रष्टाचारी आहेत. त्यांना माहित आहे, या देशात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे. जनता आपल्याला जाब विचारणार नाही, पंतप्रधान तर त्याहून नाहीत. (राष्ट्रकुल स्पर्धेत अमेरिका कुठे आहे?) त्यामुळेच या सर्व चांडाळाची हिंमत झाली आपल्या देशाचे नाव बदनाम करण्याची. सर्व जगात आपली मान लाजेने खाली गेली आहे. स्वच्छतेच्या मुद्द्यावरुन काही देश स्पर्धेतून नाव काढून घ्यायची भाषा करीत आहेत. संतापजनक आहे हे. पण भ्रष्टाचारात लडबडलेल्या समितीला त्याचे काय? त्यांना फक्त मलिदा खाण्याशी मतलब.
प्रश्न इतके दिवस आपण काय केले हा आहे आणि ‘काहीच नाही’ हे त्याचे उत्तर आहे. आता स्पर्धच्या निमित्ताने तरी आपण जागे होणार आहोत की नाही हा मुद्दा आहे. सुरेश कलमाडी आणि कंपनीला कठोर शासन झालं पाहिजे ही मागणी आपण करणार आहोत की नाही? त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली नाही तर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला चालला पाहिजे आणि त्यांना उरलेलं आयुष्य तुरुंगात काढायला लागलं पाहिजे. तरच आमचे थोडेफार समाधान होईल. यापुढे आम्ही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही हा संदेश जनतेतूनच राजकारणी आणि नोकरशाहीपर्यंत गेला पाहिजे तरच काही उपयोग आहे. अयोध्या प्रकरणी 18 वर्षानंतर का होईना नागरिक संबंधितांना योग्य तो संदेश देत आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुनही तसा दिला जाईल का? म्हणूनच म्हटलं सगळं काही आपल्याच हाती आहे, जबाबदारी आपलीच आहे.

2 comments:

  1. अयोध्या आणि भ्रष्टाचार या दोन्ही मुद्द्यांवर पोटतिडकीने मांडलेली मतं एकदम मान्य... पण हे दोन्ही विषय एकाच लेखात न लिहिता वेगवेगळे लिहिले असते तरी चाललं असतं... याचं कारण असं की अयोध्या प्रकरणात शांतता राखण्यासाठी जनतेचा थेट सहभाग असणार आहे. लोकांनी डोकी शांत ठेवली तर कोणतीही गडबड होण्याची शक्यता नाही. शांतता राखण्याचं आवाहन करून अनेक जण शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करत असले तरी अद्याप तरी गोंधळ व्हायची शक्यता नाही. पण कॉमनवेल्थ भ्रष्टाचाराच्या बाबतीत एकदा निवडणूक झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला करण्यासारखं काहीही नाही. केवळ पेपरात भ्रष्टाचाराचे आकडे वाचणे आणि गाडीत किंवा बसमध्ये तावातावाने चर्चा करणे या दोनच गोष्टी कॉमन मॅन करू शकतो व तितक्याच करतो. हे दोन्ही विषय एकाच लेखात आल्यामुळे एकूण लेखाचा फोकस गेला आहे, असं वाटतं. म्हणजे कर्जतला निघालेलो असताना चुकून कसारा लोकल पकडावी आणि खर्डीला गेल्यानंतर हे लक्षात यावं, असं तुझा लेख वाचताना वाटलं... जरी तुला या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध दिसत असेल, तरी तो लेखात उमटलेला नाही. अन्यथा वैचारिक पातळीवर लेख (म्हणजे दोन्ही लेख) उत्तम झाला आहे, हे सुरूवातीलाच मान्य केलं आहे.

    ReplyDelete
  2. Amol :
    As per my view do something by creating some innovative things and that will be helpful to our nation rather than fighting for this concept of Ayodhya.It will neither solve anybodays problem but definatly it will increas the problem.Great Nima

    ReplyDelete