Tuesday, August 25, 2009

मेरा भारत....

१५ ऑगस्टच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे यंदाही मला एक इमेल आला. (आला की आली?) त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे देशप्रेमानं भारलेला मजकूर होता. गेल्या दहा हजार वर्षांपूर्वीपासून भारत हा सर्वश्रेष्ठ देश कसा आहे, भारतात कोणकोणते महत्त्वाचे शोध लागले, अमेरिकेत किती भारतीय आहेत आणि त्यांचं अमेरिकेच्या प्रगतीत काय योगदान आहे, असा भरणा त्या इमेलमध्ये होता. इमेल पाठवणाऱ्याच्या, किंबुहना ते तयार करणाऱ्याच्या देशभक्तीबद्दल मला काही शंका नाही. पण मला आक्षेप आहे, तो याबद्दल की हा सगळा डोलारा एका भासावर, illusion वर उभा आहे. भारत दहा हजार वर्षापूर्वी किती भारी देश होता, याचे सूर आळवून सध्याच्या समस्या सुटणार आहेत का? किंवा स्पष्ट शब्दांत बोलायचं तर भारत आज महान, सर्वश्रेष्ठ देश होणार का? नाही होणार. त्यासाठी काही हजार वर्षांपूर्वीच्या पिढ्यांनी जसे प्रयत्न केले, तसेच आपल्यालाही करावे लागणार आहेत. कमालीचं दारिद्र्य, असुरक्षितता, शिक्षणाचा बोजवारा, पाण्याच्या समस्या, पर्यावरणाचा नाश, भ्रष्टाचार अशी अनेक संकटं आपल्यासमोर आहेत. त्यातली कित्येक आपणच तयार केलेली आहेत. मुर्खासारखं पाणी वाया घालवणं, कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी किंवा इतरांआधी आपलं काम व्हावं म्हणून पटकन काही नोटा सरकवणं, आळस, काम न करता मोठमोठ्या गप्पा ठोकणं असे अनेक दुर्गुण आपल्यात आहेत. ते दूर केल्याशिवाय भारत महान कसा होईल? भ्रष्टाचार हा तर मोठा शत्रू आपणच तयार करुन ठेवलाय. भ्रष्टाचारामुळेच देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात येते, सरकारच्या काही उत्तम योजनांचा त्यामुळेच बोजवारा उडतो, अशा एक ना अनेक गोष्टी आहेत. साधं शिक्षणाचं उदाहरण घ्या. एकीकडे शाळांमध्ये शिक्षकच नसण्याचं प्रमाण मोठं आहे, दुसरीकडे हजारो बीएड, डीएडधारक विद्यार्थी बेकार आहेत. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे त्या एकत्र आल्या तर समस्या सुटायला थोडीफार तरी मदत होईल, पण तेही होऊ नये? ग्रामीण भागातले शिक्षकाविना असलेले विद्यार्थी आणि असे बेकार शिक्षक यांना एकत्र आणण्याची एकही योजना असू नये का? काही ठिकाणी आदर्शवादी तत्वांवर यासाठी काम होतं, पण त्यानं समाजाची संपूर्ण गरज पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचं पाठबळ लाभलेली ठोस योजनाच हवी. अशा खूप गोष्टी आहेत, शिक्षणाचं उदाहरण वानगीदाखल दिलं. मला हे म्हणायचंय की प्रयत्न केल्याशिवाय या समस्या सुटणार नाहीत. जिथे एकतृतियांश लोक भुकेकंगाल आहेत, धड वीस टक्के विद्यार्थीही पदवीशिक्षण पूर्ण करत नाहीत, तो देश महान कसा असेल? महान आणि श्रेष्ठ देशांमध्ये लोकांच्या अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. शंभर टक्के लोकांच्या गरजा कदाचित पूर्ण होऊ शकणार नाहीत. तसं कुठेच होत नाही, पण ज्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत असे नागरिक अपवादात्मक असावे लागतील. एक सुरक्षित आणि समाधानी समाज तयार झाल्याशिवाय आपला देश महान होणार नाही. आपल्याकडे खूप चांगले गुण असतील, उत्तम बुद्धिमत्ता असेल, पण या गोष्टी सुरक्षित समाजासाठीच उपयोगी आहेत. उपाशीपोटी उत्तम तत्वज्ञान कोणाला शिकवणार? त्यामुळेच इमेल तयार करणाऱ्या आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या माझ्या मित्रांना मला सांगावसं वाटतं, की आपला देश महान नाही, तो महान होऊ शकतो पण त्याला खूप कष्टांची गरज आहे. एका जुन्या सहकाऱ्याच्या सौजन्यानं गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची कविता वाचायला मिळाली, Where The Mind is Without Fear, माणसानं भयमुक्त जीवन जगावे, मुक्तपणे सर्वांना ज्ञान मिळावे ही त्यामागची कल्पना. बुरसटलेल्या विचारांमुळे माणसाची वैचारिक प्रगती थांबू नये, ही गुरुजींची आस. महान आणि सर्वश्रेष्ठ देशाची हीच खूण असेल.

5 comments:

  1. एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता त्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. भारतानं अनेक गोष्टींमध्ये क्रांती केली आहे, यावर तरी तुझा विश्वास आहे ना. भाक्रा नानगल, हिराकूड किंवा अगदी कोयनासारखं धरण अगदी जवळून पाहिलं की भारताच्या ताकदीचा अंदाज येतो. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून केलेली अणुचाचणी हे भारताच्या ताकदीचंच लक्षण आहे. इतक्या कोटींचा देश पोसण्यासाठी आवश्यक धान्यनिर्मिती करण्याचं आव्हान आपण किती वर्ष पेलतो आहे, ही आपली ताकदच नाही का? तू उपस्थित केलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत. गैरलागू नाहीत. पण त्यातले बहुतांश मुद्दे हे प्रचंड लोकसंख्येशी निगडित आहेत. इतकी प्रचंड लोकसंख्या असतानाही आपण विविध क्षेत्रांमध्ये जी प्रगती करतोय ती पाहिली की डोळे दिपून जातात असं नाही. पण किमान दिलासा तरी मिळतो. चांद्रयानसारखी मोहिम असेल किंवा भटकरांचा परम कॉम्प्युटर असो, आपण दमदार वाटचाल केली आहे, असं वाटत नाही का... समाजाचे विविध स्तर जे इतकी वर्षे शिक्षणापास्नं दूर होते ते आता शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामील होताहेत. अधिक मुली शिकत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जात आहेत, या गोष्टी दिलासादायक नाहीत का...
    मेरा भारत महान आहेच... त्रुटी अनेक असतील. दोष असतील दूरही करता येतील. पण आपण खूप चांगली कामं केलेली आहेत. असं कसं होईल. फक्त वाईटच पाहिलं की निराशा येते. त्यामुळं चांगलं अगदी डोळे भरुन पहावं... मग पटेल मेरा भारत महान...

    ReplyDelete
  2. निमा, तुझा ब्लॉग वाचताना मला साधारणतः पंधरा वर्षांपुर्वीचा काळ जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. त्या वयात फारसे कळत नसायचे. पण छात्रभारतीच्या व्यासपीठावरून जी भाषणे ऐकायला मिळायची त्याची भाषा बरोबर या ब्लॉगसारखी असायची. जुना काळ आठवला. चळवळीचे दिवस आठवले. खर्रच अंगावर शहारा आला.

    ReplyDelete
  3. आशिष, मुद्दा दृष्टीकोनाचा नाही, महानतेच्या नावावर काहीजण इतरांची आणि अनेकजण स्वतःची फसवणूक करतात/करवून घेतात, त्याचा आहे. काही गोष्टी साध्य केल्यात. पण खूप करायच्या आहेत. त्याशिवाय आपण महान नाही होणार. त्यासाठी बरंच काही साध्य करावं लागेल.

    ReplyDelete
  4. आशिषच्या मतांशी जवळजवळ ९९ टक्के सहमत... तुझा हा लेख फारच निराशावादी वाटला... तुझ्या म्हणण्यात तत्थ्यांश आहे थोडासा... पण एकदम इंटुकला... कोई देश परफेक्ट नही होता... उसे परफेक्ट बनाना पडता है... पण काही गोष्टी चुकीच्या आहेत (त्या आहेतच... नाकारण्यात अर्थ नाही!) म्हणून आम्ही आमच्या स्वातंत्र्यदिनाला चेहरे पाडून बसायचं का? जो अर्धा भरलेला ग्लास आहे, त्याकडे बघायचंच नाही का? बाकी भ्रष्टाचार, लाचखोरी, चमचेगिरी, हुजरेगिरी हे सगळं निपटून काढलं पाहिजे... 'अवनी'च्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत... या मताशी सहमत न होण्यासारखं काहीच नाही...

    ReplyDelete
  5. मला असं वाटतं की, देशाची प्रगती आणि निमा मॅडमीनी उपस्थित केलेले मुद्दे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत....देशाची प्रगती नोंदवताना भ्रष्टाचार, लोकसंख्या, शिक्षणाच्या समस्या, राजकीय इच्छाशक्ती असे मुद्दे बाजुला ठेवावेत. होय आमच्या देशात कुपोषणानं चिमुकले जीव मरतात....होय आमच्या देशातला खूपसारा पैसा स्वीज् बँकेत जमा होतो....होय आमचे सगळे नेते एकजात भ्रष्ट्र आहेत....(सगळे म्हणजे सगळेच), होय जवानांच्या शवपेट्यांमध्येही इथं पैसे खाल्ले जातात...पण म्हणून विविध क्षेत्रात होत असलेली प्रगती का नाकारा....निमा मॅडमच्या मुद्द्यांचा स्वतंत्र विचार व्हावा....ह्या मुद्द्यावर स्वतंत्र विचार केल्यास त्यातला एखादा मुद्दा तरी आपण सोडवू शकू.... उदाहरणार्थः भ्रष्ट्राचाराचा विचार करायचा असल्यास मी कधी कुणाला लाच देणार नाही, अशी खूणगाठ स्वतःशी बाळगायला हवी....असे आपण करतो का....प्रत्येकाने स्वतःला विचारुन पहावं....(माझ्यासह) याच बरोबर वीज बचत, प्रदूषण, यासराख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण स्वतःला विचारुन शोधू शकतो आणि फुलं न फुलाच पाकळी म्हणून स्वतःपासूनच श्रीगणेशा करुन शकतो (श्रीगणेशा म्हणण्याला मॅडमचा आक्षेप नसावा) सो ऑल दी बेस्ट टू ऑल...

    चांगभलं

    ReplyDelete